Kho kho information in marathi : आपल्या देशात विविध परंपरागत खेळ खेळले जातात.खेळामुळे शारिरीक व्यायाम होतो.शारिरीक व्यायामासोबत मानसिक व्यायाम ही होतो.
खो खो हा एक भारतीय मैदानी खेळ आहे.हा खेळ अतिशय सोपा आणि लोकप्रिय आहे.या खेळासाठी वेग आणि कौशल्याची खूप गरज असते.वेग हे या खेळाचे आकर्षण आहे.वेगाबरोबरच ताकद,जोम,उत्साह आणि बुध्दीमत्ता यांचा ही कस या खेळात लागतो.
भारतीय खेळांचेच वैशिष्ठ्य हे की गरीबातील गरीब मुलही तो खेळ खेळू शकतो.खो खो खेळासाठी मैदानात दोन टोकांना रोवलेले खांब सोडल्यास कोणत्याही साधनांची आवश्यकता नसते.
लहानपणापासून मुलांना खो-खो,कबड्डी ह्या खेळाची ओळख करुन दिली जाते.महाराष्ट्रात शिकार करण्याची प्रवृत्ती असणारी अस्सल रांगड्या स्वभावाची मंडळी सर्वदुर आहेत.ह्या मातीत क्रांतीकारी घडले तसेच खो खो हा अस्सल शिकार साधणारा खेळ खऱ्या अर्थाने रुजला व भावला.
आजही कोल्हापूर-सांगलीच्या गड्याने मारलेली झेप चित्तथरारक असते.तर पुण्या-मुंबईच्या खेळाडूंकडे तंत्रशुध्दता, तर मराठवाड्याच्या खेळाडूंकडे असणारी दमछाक ही त्या त्या विभागाची नैसर्गिक छाप दाखवते.
आशा या पायाच्या मास पेशी अधिक मजबूत करणाऱ्या खो खो खेळाची माहिती मराठीत (kho kho information in marathi) जाणून घेणार आहोत.

खो खो खेळाचा इतिहास | Kho Kho Game History In Marathi
खो-खो हा खेळ प्राचिन काळापासून भारतात आहे.महाभारतातील युध्दाच्या वेळी कुरुक्षेत्रापासुन वापरल्या जाणाऱ्या विविध कौशल्यांमधून खो-खो ची उत्पत्ती झाली.त्या काळी खो खो रथांवर खेळला जात असे म्हणून त्याला राथेरा म्हणून ओळखले जात असे.
पुर्वी खो-खो कबड्डी या सारख्या देशी मैदानी खेळांना राजाश्रय होता. आता जसे ऑलिंपिक स्पर्धा होते तसे पुर्वी विविध देशी मैदानी खेळांच्या स्पर्धा वेगवेगळ्या संस्थानांच्या मध्ये भरविल्या जात असत.
कालांतराने हि संस्थाने विलिन झाली आणि आता ह्या खेळांच्या संघटना तयार झाल्या. आजही कोल्हापुर (शाहू महाराज) व मध्य भारत (होळकर राजे)या संस्थानांच्या नावावर खो-खो चे संघ राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होतात.
छत्रपती शाहू महाराज यांचे खो-खो व इतर मैदानी खेळावर जिवापाड प्रेम होते. त्यांच्या विषेश प्रयत्नांमुळेच १९३६ साली बर्लिन येथे झालेल्या ऑलिंपिकमध्ये खो-खो चा प्रेक्षणीय सामना खेळविला गेला. या सामन्यात आपल्या महाराष्ट्रातील अमरावतीच्या हनुमान व्यायाम शाळेच्या खेळाडूंच्या चपळ खेळाचे कौतुक हिटलरने केले असल्याची नोंद आहे.
खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया या खो-खो खेळाच्या पहिल्या राष्ट्रीय संघटनेची बांधनी १९५६ साली कै. भाई नेरुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली गेली.
याच संघटनेने खो-खो या खेळाचे नियम अधिकृतपणे लेखी स्वरूपात प्रथमच तयार केले होते.कै.भाई नेरुरकर यांच्या गौरववार्थ महाराष्ट्र शासनाच्या वतीने कै.भाई नेरुरकर चषक राज्य स्पर्धेचे आयोजन केले जाते.
खो खो खेळाचे सर्वसाधारण नियम | How To Play Kho Kho In Marathi
खोखो हा खेळ मैदानात खेळतात.कारण ह्या खेळामध्ये तुम्हाला पळायचे असते व प्रतिस्पर्शी खेळाडूला चकवा देऊन त्याला बाद किंवा त्याच्या पासून स्वतःला वाचवायचे असते.
खोखो या खेळामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. खो-खो हा खेळ दोन संघांमध्ये खेळला जातो.प्रत्येक संघात १२ खेळाडू असतात.१२ खेळाडूंपैकी ९ खेळाडू मैदानात उतरतात.
एका संघातील ९ खेळाडूंपैकी ८ खेळाडू एका आड एकमेकांच्या विरूध्द बाजूकडे तोंड करून बसतात. नववा खेळाडू हा एका खांबाजवळ उभा राहतो.
दुस-या खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरवातीला क्रिडांगणात उतरतात.प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना आपल्याला शिवू न देणे असा यात मुख्य प्रयत्न असतो.
पहिले तीन खेळाडू बाद झाले की दुसरे तीन खेळाडू खेळात येतात.बसलेल्या खेळाडूंमध्ये पाठलाग करणा-याने मागून स्पर्श करून खो म्हणल्यावरच दुसरा खेळाडू पळणा-याचा पाठलाग करू लागतो आणि खो देणारा त्याची जागा घेतो.
प्रत्येक संघ दोन डाव बसतो आणि दोन डाव धावा करतो.बसलेल्या संघातील खेळाडूला आक्रमक (Chaser) म्हणतात.धावणाऱ्या संघातील खेळाडूला संरक्षक(Defender) म्हणतात.
चेसर संघाच्या खेळाडूने धावणाऱ्या संघाच्या धावणाऱ्या खेळाडूला स्पर्श केल्यास, चेसर संघाला एक गुण मिळतो.खेळाच्या शेवटी सर्वाधिक गुण मिळवणारा संघ विजेता घोषित केला जातो.
खो खो खेळातील महत्वाचे शब्द व त्याचा अर्थ
- आक्रमक :- आक्रमण करणाऱ्या संघातील जे आठ खेळाडू आक्रमक जागेत बसतात आक्रमक(CHASER) असे म्हणतात.
- गतिमान आक्रमक :- आक्रमक जागेत बसलेले आठ आक्रमक वगळता उरलेला नववा आक्रमक(ATTACKER) जो पळणाऱ्या खेळाडूंचा(संरक्षकांचा) पाठलाग करुन हस्तस्पर्शाने बाद करण्याचा प्रयत्न करतो त्यांस गतिमान आक्रमक असे म्हणतात.
- संरक्षक :- संरक्षणाच्या पाळीसाठी जे रक्षक क्षेत्राच्या आत असतात त्यांना संरक्षक(DEFENDER)) असे म्हणतात..
- गतिमान संरक्षक :- ज्या संरक्षकावर प्रत्यक्ष आक्रमण सुरु आहे त्यास गतिमान संरक्षक (ACTIVE DEFENDER) असे म्हणतात.
- नियमोल्लंघन :- आक्रमक किंबा गतिमान आक्रमक यापैकी कोणीही कोणताही नियम मोडणे यांस नियमोल्लंघन (Foul) असे म्हणतात.
- दिशा घेणे :-गतिमान आक्रमकाने एका स्तंभरेषेकडून दुसर्या स्तंभरेषेकडे जाणे आणि / किंबा खो मिळाल्यानंतर एखाद्या विशिष्ट स्तंभरेषेकडे जाणे यास दिशा घेणे असे म्हणतात.
- स्कंधरेषा :-गतिमान आक्रमकाच्या स्कंधांच्या मध्यबिंदूतून जाणाऱ्या कल्पित रेषेस स्कंधरेषा असे म्हणतात.
- मागे हटणे :- गतिमान आक्रमकाने एकदा दिशा घेतल्यानंतर पुढे जात असताना तोडलेले अंतर कोणत्याही कारणाने कमी करणे यास मागे हटणे असे म्हणतात.
- प्रवेश करणे :- रक्षकाचा क्षेत्राबाहेरील जमिनीशी असलेला पाऊलांचा संपर्क सुटल्यास आणि क्षेत्राशी आल्यास त्यास प्रवेश करणे असे म्हणतात.
- क्षेत्राबाहेर जाणे :-संरक्षकाचा क्षेत्राशी असलेला पाऊलांचा संपर्क सुटल्यास आणि क्षेत्राबाहेरील जागेशी संपर्क आल्यास त्याला क्षेत्राबाहेर जाणे असे म्हणतात.
खो खो नियम | Kho Kho Game Rules In Marathi
खेळ कोणतापण असो,त्याला नियम(kho kho information in marathi niyam) हे असतातच. खो खो या खेळाचे नियम खाली दिले आहेत.
- नाणेफेक जिंकणारा संघनायक आक्रमण अगर संरक्षण यापैकी एकाची आपली निवड स्पष्ट करतो.
- कोणतेही आठ आक्रमक आक्रमकाच्या जागेत बसलेले खेळाडू त्यांच्या शेजारी खेळाडूच्या विरूध्द बाजूकडे तोंड करून बसतात.९.वा आक्रमक आक्रमण सुरुकरण्यासाठी कोणत्याही एका मुक्तक्षेत्रांत उभा’राहील.एकदा निवडलेले क्षेत्र बदलता येणार नाही.
- पाळीची सुरवात करताना तीन संरक्षकांची पहिली तुकडी क्षेत्राच्या आतं असते.
- पाळीची सुरवात केल्यावर कुणीही आक्रमकाने खो मिळाल्याशिवाय आक्रमकाची जागा सोडू नये किंवा दिशा बदलू नये. त्याने तसे केल्यास ते नियमोल्लंघन आहे आणि त्याची पुनरावृत्ती म्हणजे गैरवर्तणूक ठरते.
- गतिमान आक्रमकाने खो देतेवेळी तो आक्रमकाचे पाठीमागून खांदा व कमरेच्या मधील भागास हात लावून आणि संरक्षकास व अधिकाऱ्यांना ऐकू जाईल अशा स्पष्ट व मोठया आवाजात दिला पाहीजे.आक्रमकाने खो दिल्याशिवाय उठू नये.
- धावताना धावपटूचा पाय सीमेबाहेर गेला तर तो आऊट मानला जातो.
- आक्रमण संघाचा खेळाडू जोपर्यंत खांबाला वळसा घालत नाही तोपर्यंत मध्यभागी गल्लीपासून दुसऱ्या दिशेने जाऊ शकत नाही.
- आक्रमण संघातील खेळाडू बसलेल्या खेळाडूकडे जातो आणि स्पर्श करून मोठ्या ‘खो’ म्हणतो.याला खो देणे म्हणतात.कोणताही खेळाडू ‘खो’ दिल्याशिवाय शिवाय उठून पळू शकत नाही.
- आक्रमकाने जर मध्यरेषा ओलांडली तर तो फाऊल मानला जातो.
- गुण समान असल्यास, एक अतिरिक्त डाव आयोजित केला जातो.
- एखाद्या खेळाडूला दुखापत झाल्यास त्याच्या जागी बदली खेळाडूंपैकी एकाची नियुक्ती केली जाते.
इतर नियम खाली दिल्या प्रमाणे
पुरुष/महिला/कुमार/मुली | किशोर/किशोरी | |
एकूण डावांची वेळ | दोन डाव ३६ मिनीटे | दोन डाव २८ मिनीटे |
प्रत्येक डाव | दोन पाळ्या प्रत्येकी ९ मिनीटांच्या | दोन पाळ्या प्रत्येकी ७ मिनीटांच्या |
दोन पाळ्यांमधील मध्यंतर | ३ मिनीटे | ३ मिनीटे |
दोन डावांमधील मध्यंतर | ६ मिनीटे | ५ मिनीटे |
वयोगट | कुमार व मुली गट – १८ वर्षे व त्याखालील वय पुरुष व महिला गट – वयाची अट नाही | १४ वर्षे व त्याखालील वय |
मुल्यांकन (निर्देशक) | २५० | २१५ |
निर्देशक काढण्याचे सुत्र | उंची (से. मी.) + वजन (किलोग्रॅम) + वय (पूर्ण वर्षे) |
खो खो खेळाचे मैदान माहिती मराठी | Kho Kho ground measurement information in Marathi
खोखो हा खेळ मैदानात खेळतात.खो खो ग्राउंड मोजमाप(Kho Kho ground measurement information in Marathi) कसे व किती असावे ते खाली विस्तारित दिलेले आहे.

मोजमापे मैदानाची | मोजमापे पुरुष/महिला/कुमार/मुली | किशोर/किशोरी |
---|---|---|
क्षेत्र (FIELD) | २७ मीटर x १६ मीटर | २३ मीटर x १४ मीटर |
क्रीडांगण (COURT) | २४ मीटर x १६ मीटर | २० मीटर x १४ मीटर |
अंत रेषा (END LINE ) | १६ मीटर | १४ मीटर |
बाजू रेषा (SIDE LINE) | २७ मीटर | २३ मीटर |
मुक्तक्षेत्र (FREE ZONE ) | १.५ मीटर x १६ मीटर | १.५ मीटर x १४ मीटर |
मध्यपाटी ( CENTRAL LANE ) | २४ मीटर | २० मीटर |
आडवी पाटी (CROSS LANE ) | ३५ सेमी. रुंद | ३० सेमी. रुंद |
लगतच्या दोन चौरसांमधील अंतर | २३० सेमी. | १९० सेमी. |
स्तंभ रेषा व पहिली आडवी पाटी यामधील अंतर | २५५ सेमी. | २१५ सेमी. |
राखीव क्षेत्र (LOBBY) | १५० सेमी. | १५० सेमी. |
रेषेचीरुंदी(WIDTH OF THE LINE) | २ ते ४ सेमी. | २ ते ४ सेमी. |
प्रवेश क्षेत्र (ENTRY ZONE) | ८.२० मी. x०.५ मी. | ६.८५ मी. x०.५ मी. |
खो खो खेळाचे पुरस्कार | Awards For Kho Kho In India
खो खो खेळाडूंना त्यांच्या खेळाप्रती समर्पण आणि त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल वेगवेगळे पुरस्कार मिळतात. यापैकी काही पुरस्कार खालीलप्रमाणे आहेत.
राष्ट्रीय पुरस्कार
- द्रोणाचार्य पुरस्कार – क्रीडा प्रशिक्षणातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिला जातो.
- अर्जुन पुरस्कार – क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो.
राष्ट्रीय स्पर्धेतील सर्वोकृष्ट खेळाडू
गट | पुरस्कार |
---|---|
पुरुष | एकलव्य |
महिला | राणी लक्ष्मीबाई |
कुमार | वीर अभिमन्यू |
मुली | जानकी |
किशोर | भरत |
किशोरी | इला |
राज्यस्तरीय पुरस्कार
- शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार – खेळाडू
- शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार – संघटक
- उत्कृष्ट राज्य क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार – प्रशिक्षक / दादोजी कोंडदेव पुरस्कार
- शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार
राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेतील सर्वोकृष्ट खेळाडू
गट | पुरस्कार |
---|---|
पुरुष | राजे संभाजी |
महिला | राणी अहिल्या |
कुमार | विवेकानंद |
मुली | सावित्री |
खो खो खेळाचे फायदे मराठी | Benefits of Playing Kho Kho In Marathi
आजच्या संगणक आणि मोबाईलच्या युगात मुलांचे मैदानी खेळ खेळण्याचे प्रमाण कमी झाले आहे.बौध्दिक, शारिरीक विकासासाठी मुलांनी मैदानी खेळ खेळणे महत्वाचे आहे.
खो-खो हा असा खेळ आहे,ज्यामुळे शारिरीक विकास चांगला.खो खो खेळण्याचे काही विशेष फायदे खाली वाचा.
- खो-खोमुळे स्टॅमिना वाढण्यास मदत होते.रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
- बौध्दिक क्षमता ही वाढते.त्यामुळे मुलाचा सामाजिक आणि मानसिक विकास होण्यास मदत होते.
- खो-खो खेळल्यामुळे मन प्रसन्न राहते.
- खो-खो खेळल्याने मुले चांगली, ठणठणीत, प्रेरित, उत्साही आणि चीरतरुण राहतात.
- खो-खोमुळे मुलांना नैराश्य, चिंता, तणाव दूर करण्यात आणि आत्मसन्मान वाढवण्यास मदत होते.
- खो-खो खेळल्यामुळे संघभावना आणि नेतृत्व कौशल्ये विकसित होतात.
खो खो खेळातील प्रमुख राष्ट्रीय स्पर्धा | Kho Kho National Tournament
खो खो हा देशभरात लोकप्रिय आहे. ह्या खेळला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवा,उत्तम खेळाडू तयार व्हावे या साठी देशातील सरकार विविध राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करते.काही प्रमुख राष्ट्रीय स्पर्धा खाली दिल्या आहेत.
- राष्ट्रीय खो-खो चॅम्पियनशिप.
- नेहरू गोल्ड कप.
- फेडरेशन कप.
- राष्ट्रीय महिला चॅम्पियनशिप.
- ज्युनियर नॅशनल
- सब ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप.
- स्कूल चॅम्पियनशिप
- ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिप आणि फेडरेशन कप.
निष्कर्ष | Conclusion
भारतातील सर्वात लोकप्रिय खो खो खेळ त्याच्या साधेपणामुळे मोठ्या संख्येने लोक खेळतात. या खेळासाठी वयाची अट नाही. हा खेळ माणसातील शिस्त, आज्ञाधारकपणा आणि खिलाडूपणा वाढवतो.मला आशा आहे हा लेख तुम्हाला आवडला असेल.
या लेखात Kho Kho information in marathi म्हणजेच खो खो खेळाची माहिती मराठी मध्ये आपल्याला काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण आम्हाला कमेन्ट किंवा ईमेल लिहून सांगू शकता.
यातून काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांपर्यन्त पोहचवा.फेसबुक,ट्विटर आणि इतर सोशल मीडिया साइट्स वर हे शेअर करा.धन्यवाद.
हे पण वाचा : Kabaddi information in marathi
Football Information In Marathi
खो खो खेळाबद्दल सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)
खो खो संघात १२ खेळाडू असतात.१२ खेळाडूंपैकी ९ खेळाडू मैदानात उतरतात.
खो खो खेळण्याचे मैदान आयताकृती असते. त्याची लांबी 27 बाय 16 मीटर (89 फूट × 52 फूट) आहे.
जमिनीच्या वरून 120 सेमी.
सारिका काळे